जागतिक वसुंधरा दिन !!
२२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिन! आजच्या करोना च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर हा
विचार मनात आल्याशिवाय रहात नाही, कि आपण खरंच हा दिवस का
साजरा करतोय? आपलं काही चुकतंय का?
आत्मपरीक्षण केल्यावर
लक्षात येतंय कि मुळात वसुंधरेचा सन्मान असा कधी आपण केलाच नाही, नुसताच हा
दिवस साजरा करून काय उपयोग? आपण किती क्षुल्लक आहोत, निसर्गाच्या हातातलं बाहुलं आहोत ही हतबलता ही जाणवते! अशाच एका विमनस्क
क्षणी ह्या ओळी मला सुचल्या!
वसुंधरा
वसुंधरा माझी माय, माझी धरा,
तिचे उपकार जन्मभर न विसरा!
मानव खरं तर तिच्यावर उपरा,
तिचे उपकार जन्मभर न विसरा!
मानव खरं तर तिच्यावर उपरा,
त्याचे
अस्तित्व, तिचा छोटासा कोपरा!
तशी ती कनवाळू,
मन तिचे मायाळू,
सर्वाना पदराखाली सांभाळू,
भरवी घास अळूमाळू!
नका तिला ओरबाडू,
निसर्ग तिचा ओसाडू,
पाणी तिचे व्यर्थ सांडू,
हिरवळ, झाडे फुका तोडू!
हे तिचे अवयव सारे,
पर्यावरणाचे चंद्र तारे,
सर्व सृष्टीचे घट्ट आधारे,
सारा समतोल राखणारे!
मानवाचा चोहिकडे हस्तक्षेप,
अंतराळ काबीज करण्या उत्तुंग झेप,
नद्या, समुद्राच्या मर्यादेत आक्षेप,
बेभान दौड, नीती साक्षेप!
पण कधीतरी लवंडतात मापं,
ओलांडतात शंभर पापं,
वसुंधरेचाच लागतो शाप,
सृष्टी मग पावते कंप!
तिला मानहानी जेव्हा न झेपली,
अवचित अपमानित ती कोपली,
तिचा संयम संपला,
आणि मानव तेंव्हा हादरला!
करोना सारखा नगण्य विषाणू,
आवळतो मानवाचे अणूरेणू,
एखादा अदृश्य राक्षस जणू,
विना आवाजा ठणठणू!
प्रलय येता जीव थरकापे,
मानव हताश संतापे,
वेळी तिचा सन्मान जर जपे,
न उतली असती पापे!
करुया तिचा सन्मान,
राखून जैव विविधतेची शान,
तिच्या सजण्यातच आपली जान,
नको करुया तिचा अनमान!
वसुंधरेची ही माया,
लाभण्या रे सखया,हो उतराई, पड पाया,
हो वचनबद्ध, न वसा टाकाया!
Dr. Jaya Kurhekar,
Green Blogger