Tuesday, December 31, 2024

डिसेंबर आणि जानेवारी!

 डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ !



डिसेंबर व जानेवारी, एकमेकांना खेटून उभे,

गुंतलेले, गुरफटलेले परंतु आनंद आणि दुःखांचे समान दुवे!

एकात ११ महिन्यांच्या आठवणींचे सुरेख गुंफण,

दुसऱ्यात, येणाऱ्या ११ महिन्यांचे आशादायी चित्रण!


दोघंही गूढ, दोघंही नाजूक, मध्ये घेतात थोडासा विश्राम,

दोघंही समय अवकाशाचे प्रवासी, नशिबातल्या सटवाईचे गुलाम!

दोघांचे चेहरे सारखे, ऋतू सारखे, सारखे असतात रंग,

भिंतीवरच्या दिनदर्शिकेची पानं, शिशिराच्या चाहुलीनं कुडकुडते अंग!

मात्र दोघांची निरनिराळी शैली, वेगवेगळे अस्तित्व, वेगवेगळे दृष्टीकोण,

अनुभवलेले आंबट, तिखट, कडू आणि गोड, अनुभूतीतले दिव्य क्षण!


एकाचा शेवट आनंदात आणि उत्सवात करावा साजरा,

दुसऱ्याला आनंदानं आणि विश्वासानं मिठी मारावी, असा साजिरा - गोजिरा!

एक आठवणी जपतांना हसवतो आणि रडवतो,

दुसरा गोड, गुलाबी, कंच हिरवी स्वप्नं दाखवून रंजवतो!


एकाला तळमळीनं, प्राणपणानं, मनापासून अनुभवलेलं,

तर दुसऱ्याचं सकारात्मक वचनांनी भरलेलं आभाळ जपलेलं!

एकाच माळेची ही दोन टोकं, एकमेकांशी जोडलेली,

वेगवेगळी, निरनिराळी, परंतु दोन डोळ्यांसारखी जवळीक साधलेली!


ज्यानं आनंदानं एकाला निरोप देऊन, दुसऱ्याला मिठी मारली,

त्याला डिसेंबरनं दिला आनंदानं निरोप, जानेवारीनं नवीन संकल्पांची जोड दिली!


जानेवारी ते डिसेंबर केवळ १२ महिन्यांचा ताळमेळ,

पण ३१ डिसेंबर ते १ जानेवारी, मात्र काही सेकंदांचाच खेळ!


सामान्य अशा वर्षाचे, अगदी सामान्य वाटणारे असे हे दोन मास,

परंतु उलथापालथ करणारे आणि घडलेल्या घटनांच्या स्मृतींच्या ऋणात खास!

दोघं मिळून, अनेक महिने ओवून ठेवतात एकाच साखळीत अखंड,

आपापल्या वाटेनं जातांना मात्र जगण्याचं प्रयोजन देतात उदंड!


Green Blogger

Prof. Dr. Jaya Kurhekar