स्नोक्वॉलमी नदी तशी शांत परंतु काही वेळा नदीचा प्रवाह संपूर्ण खोऱ्यातून वाहून जाण्याइतपत उंच असतो, ज्यामुळे जवळजवळ एक आंधळा स्प्रे तयार होतो. पाणी जास्त असताना, धबधबे पडद्याचे रूप धारण करतात. अभूतपूर्व असे हे द्रुश्य मनाला भुरळ घालते. मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षाव असेल आणि त्यानंतर जर उबदार पावसाळी हवामान असेल तर जास्त पाणी येते. नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत, पावसाळ्यात हे द्रुश्य पहावयास मिळते. या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही;
All the waters run to the sea,
And yet the sea is not full,
And from the place where they began,
Thither they return again!
आजूबाजूचा निसर्ग अत्यंत मनमोहक आहे. अनादी कालापासून इथे जमिनीत भूकंपीय प्रक्रिया सुरु असतात, अजूनही आहेत. मॅग्मा नावाचा खडक त्यातून निर्माण झालाय आणि तोच या कॅस्केड डोंगर रांगांमधे प्रामुख्यानं सापडतो. वीस मिलियन वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या प्रक्रियांमुळे या नदीला उचललं गेलं आहे. पाणी अत्यंत वेगानं दरीत झेप घेतो आणि त्याचा वीज निर्माण करण्यासाठी वापर करण्यात येतो. हे तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे. अखंड वॉशिंग्टन मध्ये ही वीज वितरित होते.
स्नोक्वाल्मी फॉल्स हे, वॉशिंग्टन राज्याच्या पश्चिमेला असलेल्या स्नोक्वाल्मी व्हॅलीमध्ये अनादी काळापासून राहणाऱ्या स्नोक्वाल्मी लोकांसाठी, एक संस्कृती, श्रद्धा आणि अध्यात्माचे केंद्रस्थान आहे. हा एक पारंपारिक सांस्कृतिक वारसा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे त्यांचे पारंपारिक दफन स्थळ आहे. अशी श्रद्धा होती की धबधब्याच्या पायथ्यापासून उगवलेले धुके, स्वर्ग आणि पृथ्वीला जोडतात. त्या शक्तिशाली प्रवाहातून उगवणार्या धुक्यांद्वारे परमेश्वराची प्रार्थना केली जात होती. पहिल्या स्त्री आणि पुरुषाची निर्मिती इथे झाली होती, असे म्हणतात.
1992 मध्ये, राष्ट्रीय स्तरावर, ऐतिहासिक स्थळांच्या यादीत, पारंपारिक सांस्कृतिक मालमत्ता म्हणून, ह्या धबधब्याचे प्रथम नामांकन करण्यात आले. परंतु प्युगेट साउंड एनर्जी मालमत्तेच्या मालकांनी या सूचीवर आक्षेप घेतला. कालांतराने मालकांनी त्यांचा आक्षेप मागे घेतला आणि 2 सप्टेंबर 2009 रोजी, ह्या फॉल्सची औपचारिकपणे नॅशनल रजिस्टरमध्ये नोंद झाली. मुकलशूटने स्नोक्वाल्मी फॉल्सच्या वर एक हॉटेल, कॉन्फरन्स सेंटर आणि 175 घरे बांधण्याची योजना आखली. स्नोक्वाल्मी इंडियन ट्राइबच्या सदस्यांनी सगळ्या गोष्टींना विरोध केला आणि "Snoqualmie Falls वाचवा" मोहीम सुरू केली.
सध्या पर्यावरण संरक्षणासाठी अनेक योजना इथे राबविल्या जातात आणि इथल्या स्वच्छ प्रदूषण विरहित वातावरणाचा पावलोपावली अनुभव येतो. वर्ष भर इथे खूप थंडी असते आणि प्रसन्न झिरमिर पाऊस! आल्हाददायक वातावरण आणि आजुबाजुला घनदाट झाडं!
दरवर्षी दीड दशलक्षाहून अधिक प्रवासी फॉल्स बघायला येतात. इथे दोन एकर जमिनीवर एक सुंदर पार्क, एक निरीक्षण डेक आणि भेटवस्तूंचे एक दुकान आहे. अत्यंत प्रेक्षणीय अशा या स्थळाला एकदा तरी भेट द्यावीच!
1914 साली थॉमस हार्डी यांच्या सुरेख शब्दात, अखंड वाहणारा हा जलस्रोत;
The purl of a runlet that never ceases,
In stir of kingdoms, in wars, in pieces;
In a hollow boiling voice it speaks,
And has spoken since hills were turfless peaks!
Green Blogger
Dr. Jaya Kurhekar