Wednesday, October 15, 2025

COOL COOL COULEE DAM, USA!


या वर्षीच्या उन्हाळ्यात अमेरिकेला जाण्याचा कार्यक्रम आखला गेला, तेंव्हा, अमेरिकेतील सर्वात मोठं पॉवर स्टेशन - ग्रँड कौली धरण बघायला मिळणार हे स्वप्नातही नव्हतं. वेनाटची या ठिकाणी आम्ही वास्तव्य केलं, जिथून या धरणावर जाण्याची संधी आम्हाला मिळाली. अत्यंत शिस्तबद्ध अशा वेळा, आरामदायी, वातानुकुलीत बस, सोबत मार्गदर्शक अशा शैलीत, ग्रँड कौली धरण आम्ही पाहिलं.

ग्रँड कौली धरण हे अमेरिकेतील सर्वात मोठं पॉवर स्टेशन म्हणून प्रसिध्द आहे. वॉशिंग्टन राज्यातील कोलंबिया नदीवरचं हे धरण जलविद्युत निर्मिती आणि सिंचन पाणी पुरवण्यासाठी बांधलं गेलं आहे. हे एक कोन्क्रीटनं बनवलेलं भव्य धरण आहे जे केवळ त्याच्या भव्य आकारमान व वजनामुळं पाणी रोखतं आणि त्यामुळं त्याला गुरुत्वाकर्षण धरण असं संबोधलं जातं. १९३३ ते १९४२ च्या दरम्यान हे धरण बांधलं गेलं. कोलंबिया नदी ही उत्तर अमेरिकेतील, उत्तर पश्चिम दिशेला असलेली सर्वात मोठी नदी आहे, जी ब्रिटीश कोलंबियाच्या रॉकी माउंटन्स या डोंगराळ भागातून, कॅनडातून उत्तर अमेरिकेत प्रवेश करते आणि शेवटी प्रशांत महासागरात जाऊन मिळते.

ग्रँड कौलीचं धरण, कोलंबियाच्या पठारावरील प्राचीन नदीच्या पात्रात बांधलं गेलं आहे, जे पात्र, कॅलेब्रियन युगात, हिमनद्या आणि पूर यांना मागे सारून निर्माण झालं, असं म्हणतात. १९२० साली, हे धरण बांधण्याचा प्रस्ताव पुढं आला परंतु काहींच्या मते ग्रँड कौली गुरुत्वाकर्षणाच्या कालव्यानं सिंचन करण्यासाठी जास्त महत्वाचं होतं तर काहींच्या मतानुसार उंच धरण आणि पंपिंग योजना जास्त फायद्याची ठरली असती. १९३३ मध्ये धरण बांधायला संमती मिळाली. प्रारंभिक प्रस्ताव २९० फूट उंच "लो डॅम" बांधायचा होता, ज्यात, सिंचनापेक्षा वीज निर्मितीवर जास्त भर होता. बऱ्याच वादविवादानंतर, राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी ऑगस्ट १९३४ मध्ये बांधकाम स्थळाला भेट दिली आणि "उंच धरण" बांधायला परवानगी मिळाली. ५५० फुट उंचीवरून सिंचन करण्यासाठी आणि कोलंबिया खोऱ्यात पाणी पुरविण्यासाठी पुरेशी वीज तयार करण्याची योजना झाली. धरणात तयार झालेल्या विजेमुळं, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात उद्योगांना चालना मिळाली. आता हे धरण ६८०९ मेगावॅट क्षमता असलेल्या चार वीज केंद्रांना विद्युत पुरवठा करतं. आधी दोनच असणाऱ्या उर्जा निर्मिती केंद्रांमध्ये वाढ होऊन, तिसरा विद्युत प्रकल्प, "नॅट" १९६७ ते १९७४ च्या दरम्यान बांधण्यात आला. सध्याला तीन पॉवरहाऊसेस आहेत. धरणाचा जलाशय, ६,७१,००० एकर भूभागाच्या सिंचनासाठी पाणी पुरवतो. या जलाशयाला ‘फ्रँकलिन रूझवेल्ट लेक असं नाव देण्यात आलं आहे. जलाशय निर्माण करतांना, जे मूळ अमेरिकन होते आणि ज्यांच्या जमिनींना पूर आला होता, अशा ३००० हून अधिक लोकांचं स्थलांतर करावं लागलं.


डिसेंबर १९३५ रोजी, धरण बांधकामासाठी, क्रेननं बादल्या उचलुन पहिलं काँक्रीट ओतलं गेलं. या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे, काँक्रीट थंड करण्यासाठी आणि क्युरिंग करणं सोपं जावं म्हणून, धरणाच्या संपूर्ण कडक रचनेत सुमारे ३२०० कि. मी. पाईपिंग ठेवण्यात आलं, ज्यातून नदीतील थंड पाणी सोडलं गेलं. यामुळं, तापमान ४१ सेल्सियस पासून ७ सेल्सियस पर्यंत कमी झालं, तसंच धरणाची लांबी सुमारे २० सें.मी. नं कमी झालीनिर्माण झालेली पोकळी, ग्रुएटनं भरली गेली. जानेवारी १९३६ मध्ये, ग्रँड कौली ब्रिज या कायमस्वरूपी महामार्ग पुलाचं उदघाटन झालं. मार्च १९३८ मध्ये, खालचं धरण पूर्ण झालं आणि मग उंच धरण बांधण्यास सुरुवात झाली. जानेवारी १९४१ मध्ये धरणाचा पहिला जनरेटर सुरु झाला. १ जून १९४२ ला जलाशय भरला जाऊन, पहिलं पाणी धरणाच्या गळतीमार्गावरून वाहू लागलं.

ग्रँड कौली धरणाच्या वर, उत्तर धरण बांधण्यात आलं, ज्यामुळं,  कोलंबिया खोरं प्रकल्पाचं एक विशाल सिंचन पुरवठा जाळं तयार झालं. मूळ डाव्या आणि उजव्या पॉवरहाऊसमध्ये १८ मुख्य जनरेटरडाव्या बाजूला एकूण २२८० मेगावॅट क्षमतेचे तीन सेवा जनरेटर आहेत. धरणाच्या वीज सुविधांची एकूण कमाल क्षमता ७०७९ मेगावॅटपर्यंत पोहोचते.



या काळात, जलाशय क्षेत्रातील खूप झाडं कापावी लागली. या प्रकल्पावर सुमारे ८००० लोकांनी काम केलं आणि फ्रँक ए. बँक यांनी मुख्य बांधकाम अभियंता म्हणून काम केलं.

१९५२ मध्ये, ग्रँड कौली धरण स्मारकाचं चित्र असलेलं टपाल तिकीट जारी करण्याचा मान या धरणाला मिळाला. या धरणामुळं अनेक पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांना तोंड द्यावं लागलं. झुडुपांचे गवताळ प्रदेश नष्ट झाले, मासे नष्ट झाले, माशांचं स्थलांतर कायमचं रोखलं गेलं.  धरण बांधल्यामुळं, वॉशिंग्टनमधील इंचेलियम शहर पाण्याखाली गेलं, अमेरिकन मासेमारीचं महत्वाचं ठिकाण म्हणजे केटल धबधबां पाण्याखाली गेला, सॅल्मन नष्ट झाले. कोलंबिया खोरे प्रकल्पामुळं, खवले मांजर, पिग्मी ससे आणि घुबडाच्या प्रजातींच्या अधिवासांवर परिणाम झाला, परिणामी लोकसंख्या कमी झाली परंतु, पाणथळ जागा आणि नदीकाठाचे मार्ग यासारखे नवीन अधिवास देखील निर्माण झाले. धरणाच्या पर्यावरणीय परिणामांमुळं, स्थानिक रहिवाशांची पारंपारिक जीवनशैली संपुष्टात आली.

झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून धरणाच्या वर तीन मत्स्यपालन केंद्रं तयार केली गेली आहेत व मासे वरच्या कोलंबिया नदीत सोडले गेले आहेत. अर्धे मासे जलाशयाचा एक चतुर्थांश भाग आदिवासी शिकार आणि नौकाविहारासाठी राखीव आहे. मका, मेंगेनिस, हलकं अल्युमिनियम या प्रकल्पाची देणगी आहे, असं समजलं जातं.

धरणाच्या आवारात, अतिशय सुरेख व माहितीपूर्ण असं ‘व्हिजीटर्स सेंटर’ आहे, जिथं, धरणाबद्दल माहिती सांगणारी ऐतिहासिक छायाचित्रं, भूगर्भीय नमुने, टर्बाइन, धरणाचे नमुने, एक स्टुडियो व नाट्यगृह आहे. या इमारतीची रचना जनरेटर रोटरसारखी दिसते. वुडी गुथ्री’ या लोकगायकानं, या धरण निर्मितीच्या विषयावर, एक  चित्रपट काढला, व्हिडिओ तयार केले आणि कोलंबिया नदीवर गाणी लिहिली. अत्यंत विरोधातून तयार झालेलं हे धरण आता एक नंदनवन आहे. "रोल ऑन, कोलंबिया, रोल ऑन", "पाश्चर्स ऑफ प्लेंटी" आणि "ग्रँड कौली डॅम" ही या धरणावरची प्रसिध्द ‘कोलंबिया रिव्हर सॉन्ग्स अर्थात गाणी आहेत. ‘व्हिजीटर्स सेंटर’ मध्ये या धरणाबद्दलचा माहितीपट दाखवला जातो, ज्यामुळं, अशा प्रकल्पांना केवढी मोठी आणि क्लिष्ट पार्श्वभूमी असते, हे लक्षात येतं.

उन्हाळ्यात, संध्याकाळी, ग्रँड कौली धरणाच्या भिंतीवर, लेसर लाइट शो प्रक्षेपित केला जातो. लोकांना धरणाच्या सहली उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. लेक रूझवेल्ट तलावात, मासेमारी, पोहणं, नौकानयन आणि नौकाविहार करता येतो. असं, निसर्गाच्या कुशीत वसलेलं, नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं,  एक सुरेख, स्वच्छ, नीटनेटकं स्थळ, या निमित्तानं बघायला मिळालं, जिथं, हिरवीगार बाग, सुरेख रस्ते, खाद्यगृह, केम्पिंगची सुविधा, स्वच्छतागृह असं सगळंच दिमतीला हजर आहे!

‘आमच्या अंधाराचं तू प्रकाशात रुपांतर केलंसं’, या, "रोल ऑन, कोलंबिया, रोल ऑन" या गाण्यातील,  धरणाला उद्देशून म्हटलेले बोल कानात घुमत असतांनाच आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. 

                                   

GREEN BLOGGER 

प्रा. डॉ. सौ. जया कुऱ्हेकर


Dr. JAYA VIKAS KURHEKAR

KEYWORDS : FASCINATING ENVIRONMENT, DAM, PARKS, RESERVOIR 


No comments:

Post a Comment

Designed and Developed By: Tech Webz Services