Friday, April 16, 2021

 

भय!


As we enter the second major lockdown with Covid affected cases increasing day by day, I realise that we are in a different mindset now, as compared to April last year! We are more aware of the virus, the medication, the situation but still ........... the calamity goes on! There is a scare, a fear, a yearning for the situation to get better at some point now; we are eager, anxious, ready to comply but .... still something is wrong somewhere! See if you identify with my feelings............


भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते,

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते.

 वाऱ्याबरोबर गाण्याच्या ओळी तरंगत आल्या आणि माझ्या अंगावर काटा आला! खरंच सध्या कोणत्या परिस्थितीत जगतोय आपण? आजूबाजूला बघावं तिथे भय आहे, भीती आहे, उद्याची चिंता आहे, सगळं काही नीट कधी होईल ह्याची मनात धाकधूक आहे! मार्च २०२० उजाडला आणि आपल्या आयुष्यातील, न भूतो न भविष्यति असा कालावधी सुरु झाला! जानेवारी महिन्यापासून आपण बातम्या ऐकत होतो, पहात होतो, कानावर गोष्टी येत होत्या पण जोपर्यंत त्या लांब होत्या तोपर्यंत आपण ही त्याचा फारसा विचार केला नाही. “दृष्टी आड सृष्टी” ह्या न्यायानं आपण सुरक्षित आहोत ही मानसिकता सगळ्यांच्यात रुजली होती. मार्च मधल्या एका भल्या सकाळी फर्मान सुटलं की जिथं आहात तिथं थांबा, घरी जा, इकडं तिकडं भटकू नका आणि मनात शंकेची पाल चुकचुकली! काय करणार आपण घरी जाऊन, घरी राहून? त्यापेक्षा आहे ते काम पूर्णच करून टाकू या, असा विचार मनात आला; मात्र सगळ्यांनाच घरीच धाडण्याची घाई झाली आणि आता पर्याय नाही हे लक्षात आलं! तिथूनच भयाची मालिका सुरु झाली!

मार्च महिना आला आणि गेला, एप्रिल तसाच गेला, मे गेला! कुठं जाणं नाही, येणं नाही, उन्हाळी कामं नाहीत, परीक्षा नाहीत, आंबे नाहीत, एका भयाण अवस्थेत घरात बसून सगळेच केवळ वाट पहात होतो! कधीतरी परिस्थिती बदलेल, आपण बाहेर पडू, पुन्हा पूर्वी सारखे हसंत खेळत काम करू! पण नाही, प्रत्येक जण शंकित, भयभीत, जाऊ कि नको ह्या चिंतेत! दुसऱ्या गावाला कामाला गेलेले लोक थिजल्या सारखे जिथल्या तिथं! गाड्या बंद, बसेस बंद, रिक्षा बंद, जायचं तरी कसं आणि कुठं? केवळ पुस्तकात वाचलेलं प्रत्यक्षात उतरलं होतं. जे कधी खरं वाटलं नाही, ऐकलं होतं तरी देखील कपोलकल्पित वाटलं होतं, ते पुढं उभं ठाकलं होतं! महामारी खरी असते?

मानवजातीवर कोरोना विषाणूचे ब्रम्हास्त्र सुटलं होतं, अजूनही आहे! पृथ्वीवरचा सगळ्यात लहान इटुकला पिटुकला जीव पण केवढी अफाट ताकद! सुमारे ३८५ कोटी वर्षांपूर्वी पहिले अतिसूक्ष्मजीव अवतरले, ज्यांनी साडेतीनशे कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य केले. अगदी वातावरणातील टोकाचे बदल त्यांनी पचवले. 'विषाणू' हा हानिकारक अतिसूक्ष्मजीव, पेशींच्या आत जाऊन, आपलं बस्तान बसवून, प्रजनन करून एका दिवसात २८०००० अब्ज जीव जन्माला घालतो. आपल्या मानाने त्यांची प्रजनन क्षमता जबरदस्त असते! आपण स्वतःला सर्वात बुद्धिमान, ताकदवान समजतो पण खरं तर त्यांच्या समोर आपण काहीच नाही! मानवानं आपल्या बुद्धीनं बऱ्याच गोष्टी निसर्गाशी खेळत, त्याला डावलत केल्या परंतु निसर्गाच्या भात्यात अशी काही अस्त्रं आहेत, जी आपल्यावर उलटू शकतात ह्याचं भान त्याला राहिलं नाही.

अगदी साध्या, आपल्या पैकी प्रत्येकाला होणाऱ्या सर्दी खोकल्यासारख्या या “करोना” विषाणूच्या रोगानं  जनमानस भयभीत झालं. हवेतून पसरणारा, हवालदिल करणारा हा विषाणू कोविड-१९ करोनाच्या रूपात आला, तो औषधांना बधत नव्हता.  खरं जैविक जग हे माणसाच्या निरिक्षणापलिकडचं आहे. पृथ्वी हा जसा 'जलग्रह' तसाच 'सूक्ष्मजीवग्रह' आहे. खरं तर ते सूक्ष्मजीव आपल्यामध्ये आहेत, येतात, हाच मोठ्ठा गैरसमज, तर आपण त्यांच्यामध्ये, त्यांच्या समुद्रात रहात आहोत, ही वस्तुस्थिती! आपण जगत आहोत कारण त्यांनी आपल्याला जगायला परवानगी दिली आहे.

खरं तर बरेचसे रोग पृथ्वी तलावरून हद्दपार झाले आहेत, असं आपण गर्वानं सांगतो, जसं प्लेग, देवी! पण गेल्या चाळीस वर्षांत विषाणूंनी आपला पार भ्रमनिरास केला आहे! त्यांच्यापासून होणाऱ्या भयंकर नव्या रोगांनी आपल्यावर आक्रमण केलं; सार्स, मर्स, चिकुन गुन्या, डेंग्यू, स्वाईन फ्लू, करोना हे रोग त्यापैकीच!

अचानक असं काय झालं की हे विषाणू इतक्या वेगानं आपल्याला पछाडत आहेत? नैसर्गिक जनुकीय बदल, दीर्घकाळ सुप्तावस्थेत राहिलेला विषाणू परिस्थिती बदलल्याने सक्रीय होणं, द्वेषानं, स्पर्धेसाठी प्रयोगशाळेत बदल घडवून बनवलेले जीवाणू आणि विषाणू, मानवाची अनैसर्गिक वागणूक, खाणं, पिणं आणि संभोग, ही काही कारणे असू शकतात! सूक्ष्म जीवांची घरं, नैसर्गिक स्थानं आपण नष्ट केली, त्यांच्या पर्यावरणाला धक्का पोचविला. मानवानं विषारी रसायनं, वायू वातावरणात सोडले. अनेक वर्षं समृद्ध जैवविविधता बाळगणाऱ्या परिसंस्था वेगानं मोडीत निघाल्या. जंगले सपाट केली, जाळण्यात आली. नैसर्गिक रचना, हवामान यात मोठे बदल झाले, तापमान वाढत गेलं. कोट्यावधी वर्षांच्या निसर्गाच्या प्रक्रियांकडे दुर्लक्ष झालं आणि ह्याला बदलती जीवनशैली बऱ्याच अंशी कारणीभूत होती.

माणसांचे छोटे समूह परस्परांपासून वेगळे होते, तोपर्यंत जीवन शक्य झालं. शहरं व पर्यटनांमुळं विषाणूचा प्रसार वाढला.

आनंदाची शारीरिक व्याख्या, सुखलोलुप जीवनशैली, विषाणूंची संहारक क्षमता, हवा - पाण्यातुन प्रसार या गोष्टी एकत्र आल्यावर, मानवाचा 'न भूतो न भविष्यति', असा संहार सुरू झाला आहे. विशिष्ट सूक्ष्मजीवांच्या कृपेनं मानव जगला. पण भौतिक विकासाच्या नावाखाली त्यानं वृक्षं, जंगल, नदी, सागर नष्ट केले. काळाचं चक्र वेगानं उलट फिरवलं जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर आपण आपल्या विनाशाच्या जवळ पोचत आहोत.

आपण “जैविक युद्ध” ही संकल्पना ऐकली आहे पण कदाचित सध्या आपण ती अनुभवतो आहोत! 'करोना विषाणू', हे जैविक युद्धातील एक आक्रमक अस्त्र असु शकेल. प्रयोगशाळेत जनुकीय बदल घडवून आणून तयार केला गेलेला हा विषाणू असेल तर तो अस्त्र म्हणून ज्यांनी वापरला त्यांच्यावरही उलटू शकतो. अर्थात हे आपण अनेक बाबतीत म्हणू शकतो; समुद्रात भर, नद्यांमधील पाणी रोखणं, वळविणं, रसायनांचा मुक्त हस्ते वापर, प्राणी आणि वनस्पती यांचा  खाण्यापिण्यात अनिर्बंध वापर, नैसर्गिक संसाधनांचा अमर्याद वापर, या सगळ्याच गोष्टी धीम्या विषबाधा करणाऱ्या आहेत आणि या गोष्टी हळू हळू मानवाच्या लक्षात येत आहेत. कुठेतरी निसर्गाला शरण जाऊन, त्याच्यावरचा अत्याचार थांबला पाहिजे, थांबविला पाहिजे!  

औद्योगिकरण व शहरीकरणामुळं तापमानवाढ आणि नवनवीन प्रकारचे विषाणू तयार होणारच! ह्या प्रक्रिया नैसर्गिक जीवन साखळ्यांच्या विरोधात आहेत. तात्पुरते उपाय आपण अनेक करतोय, भरपूर पाणी पिणं, कडक ऊन टाळणं, सतत हात धुणं, अंतर राखणं, नाकावर मास्क घालणं पण हे विषाणूंना रोखण्याचे उपाय नाहीत. तथाकथित भौतिक विकास, निसर्ग विरोधी जीवनशैली थांबवणं हाच फक्त उपाय आहे. एवढेसे विषाणू मानवजातीला पृथ्वीवरून पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकतात. आपण निसर्गा विरूध्द जातो आहोत, तो कोपल्याशिवाय रहाणार नाही, आपला पराभव अटळ आहे!

भय आहे, भीती आहे, पण उपाय ही करावे लागतीलच! पुढच्या पिढ्यांचा विचार आता करायलाच हवा! आजचं चित्र पाहता, आता ही भीती आहे की आणखीन १०, २५, ५० वर्षांनी काय चित्र असेल? आज असा प्रश्न पडतो की खरंच आपण मार्च २०२० पूर्वी मोकळेपणाने फिरत होतो का? मागचं सगळंच स्वप्न होतं का? वेळ खरंच विचार करण्याची आहे!

 

आता धडपड केवळमानवी अस्तित्वाची,
पापे भरली शंभरपर्यावरणीय नष्ट्चर्याची,
सर्व तऱ्हांनी करण्याविषाणूस नेस्तनाबूत,
उतरले सरसावूनी मैदानी, मानवी दूत!
थोडासा विवेकथोडे आत्मभान,
शमवील धडपडराखेल सर्वांची शान!


DR JAYA KURHEKAR

GREEN BLOGGER