Wednesday, June 3, 2020



वारसा





वारसा द्यायचा, कुणी? कुणाला? कशाचा?
संपूर्णपणे उलथापालथ झालेल्या पर्यावरणाचा?
की ओढून, ओरबाडून, गलितगात्र झालेल्या धरतीचा?
की विविध रसायनं पाजून तर्रर्र झालेल्या मळ्यांचा ?
की जनुकीय अभियांत्रिकीने, मानवी हस्तक्षेपाने,
जन्म घेण्यास आणि जगण्यास लायक ठरलेल्या जनुकांचा ?
भोगतो आहोत आपण आपल्या मस्तीची फळे,
कधी जीवाणू, कधी विषाणू, कधी विषारी भाज्या, न कळे!
आपणच उठलोय का आपल्या जातीच्या जीवावर, हे गूढ ह्याचा न काही मेळ,
मानवी प्रक्रियांचा हा जीवघेणा पसारा, महत्वाकांक्षी खेळ!
वारसा कशाचा? वजाबाकीची सगळी, सगळी गणितं मांडून,
काय शिल्लक उरतंय त्या क्रेडिट आणि डेबिटचा?
की आपण वापरल्यावर काय आणि कसं कसं उरलंय,
त्याची गुणवत्ता, त्याचा कस किती शिल्लक राहिला, ह्याचा?
पुढच्या पिढ्यांना जगायला लागणाऱ्या गोष्टी किमान,
काळजी घेऊन, ठेवल्यात का जपून, राखून ईमान
हाती आहे थोडाच काळ आत्मपरिक्षणाचा,
नाही तर व्यर्थ आहे हट्ट वंशवृध्दीचा!
थोडंसं ज्ञान, थोडं आत्मभान, थोडा विचार जनांचा,
थोडा विचार, थोडी काटकसर, थोडा सहभाग सर्वांचा,
थोडीशी सद्सद्विवेक बुद्धी नक्कीच सावरु शकेल,
डोलारा डळमळणा़ऱ्या पर्यावरणाचा !
वारसा चालवायला पुढची पिढी हुशार आणि सक्षम आहे,
उत्तम गुणांचा उत्तम पर्यावरणाचा वारसा आहेच, पण जपा़यला हवा आहे !!

                                                डॉ. सौ. जया कुऱ्हेकर

Dr Jaya Kurhekar
Green Blogger

No comments:

Post a Comment

Designed and Developed By: Tech Webz Services